सामाजिक-पत्रकारी नेतृत्वाची राज्यस्तरीय दखल : शहाजी सुखदेव दिघे ‘महाराष्ट्र गौरव रत्न २०२५’ पुरस्काराने सन्मानित

प्रवरा नगरी वार्ता

कोल्हार प्रतिनिधी — महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकशाही मूल्यांना दिशा देणाऱ्या प्रखर विचारांचे, धारदार लेखनशैलीचे आणि निर्भीड पत्रकारितेचे प्रतीक असणारे सामाजिक पत्रकार शहाजी सुखदेव दिघे यांना यंदाचा महाराष्ट्र गौरव रत्न पुरस्कार २०२५ जाहीर झाला असून या घोषणेनंतर जिल्हाभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीरामपूर शहरात ७ डिसेंबर रोजी प्रथमच होत असलेल्या या भव्य राज्यस्तरीय सोहळ्यात त्यांच्या सर्वसमावेशक कार्याचा अधिकृत गौरव होणार आहे.

धारदार आणि प्रामाणिक भूमिका मांडण्याची सवय, कोणत्याही दबावाला न भीक घालता प्रश्न उपस्थित करण्याचे धाडस आणि समाजहिताच्या विषयांवर अविचल भूमिका— या सर्वांचा संगम शहाजी दिघे यांच्या लेखणीतून सतत जाणवतो. ग्रामीण भागातील दुर्लक्षित प्रश्नांना राज्याच्या पातळीवर नेणे, प्रशासनाला उत्तरदायी बनवणे आणि जनतेचा आवाज बनून प्रश्न सोडवण्यासाठी लढा देणे— या सर्व कारणांमुळे ते ग्रामीण पत्रकारितेतील सर्वात प्रभावी आणि प्रतिष्ठित नाव ठरले आहे.

पत्रकारितेबरोबरच सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय नेतृत्व दाखवले आहे. ते राज्य मराठी पत्रकार परिषद – महाराष्ट्र प्रदेश (अहिल्यानगर) जिल्हाध्यक्ष, धनेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, ‘अहिल्यानगर मराठी न्यूज’ चे संपादक, ऑल इंडिया मिडिया असोसिएशनचे खजिनदार आणि वंदे भारत टीव्ही न्यूजचे रिपोर्टर, अशा अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेत. त्यांच्या लेखनातली स्पष्टता, भूमिकेतला ठामपणा आणि बदलाची तळमळ अनेकदा जनमत तयार करते आणि प्रशासनालाही समस्यांकडे गांभीर्याने पाहण्यास भाग पाडते. ग्रामीण जनतेच्या वेदना, शेतकऱ्यांचे प्रश्न, वंचितांचे हक्क, स्थानिक विकास, धार्मिक-सांस्कृतिक उपक्रम— अशा सर्व विषयांवर त्यांनी सातत्याने प्रभावी आवाज उठवला आहे.

७ डिसेंबर रोजी श्रीरामपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र गौरव रत्न पुरस्कार सोहळ्याला यावर्षी बॉलिवूड, मराठी आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्याचे आयोजन सिनेअभिनेते सुनिल पाटील आणि निल ग्रुप कंपनीजचे सीएमडी डॉ. निहाल राजू कांबळे यांनी केले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनाही विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे.

या वर्षीच्या गौरव यादीत तन्वी भदाणे (बालकलाकार), वैभव ढूस (लेखक – अंत:अस्ति प्रारंभ), किरण कोरे (अंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता – लावणीसम्राट), अक्षय चंद्रकांत गायकवाड (गायक), योगेश सोनावणे (दिग्दर्शक), तसेच टीना शर्मा, निशा भालेकर, प्रतिभा गावडे यांचाही समावेश आहे.

पुरस्काराची घोषणा होताच पत्रकार, साहित्यिक, समाजसेवक, शिक्षक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील नागरिकांकडून शहाजी दिघे यांना शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. हा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून— ग्रामीण पत्रकारितेच्या शक्तीची दखल, लोकशाही जागृतीचा विजय आणि सतत जनतेच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या लेखणीचा सन्मान असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

७ डिसेंबर रोजी होणारा हा भव्य सोहळा महाराष्ट्रातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार असून शहाजी सुखदेव दिघे यांचे हे राज्यस्तरीय यश अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल, यात शंका नाही.

Leave a Comment