कोल्हार (ता. राहाता) : जिल्हा परिषद अहिल्यानगर यांचेवतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध गुणदर्शन स्पर्धेत कोल्हार भगवतीपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण सहा विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
किलबिल व बालगटातील विद्यार्थ्यांनी हस्ताक्षर, वक्तृत्व, गोष्ट सादरीकरण, वेशभूषा सादरीकरण तसेच वैयक्तिक गीतगायन अशा विविध स्पर्धांमध्ये शाळा व केंद्रस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विशेषतः हस्ताक्षर व वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
शाळास्तरावर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत ‘स्वर्गात आकाशगंगा’ या समूह नृत्याचे तसेच ‘जगी घुमवा वारे’ या समूहगीताचे विद्यार्थ्यांनी अत्यंत देखणे व भावपूर्ण सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
या यशामागे मुख्याध्यापक श्री. साहेबराव अनाप यांचे मार्गदर्शन तसेच वर्गशिक्षक व सर्व शिक्षकवृंदांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांना श्रीमती सविता कडलग, श्री. राजेंद्र बोकंद, श्री. हौशीनाथ सजन, श्रीमती विद्याताई उदावंत, श्रीमती मनिषा शिंदे, श्रीमती शितल देशमुख, श्रीमती लता गाडेकर, श्रीमती रूपाली नाईक व श्री. पुंडलिक महाले यांनी सातत्याने मार्गदर्शन केले.
तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या व सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे राहाता तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. राजेश पावसे, विस्तार अधिकारी श्री. विष्णू कांबळे, केंद्रप्रमुख श्री. कानिफनाथ कोळेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. विजयराव बोरुडे, उपाध्यक्ष व सदस्य, शिक्षणतज्ज्ञ, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
