साडेतीन शक्तिपीठांचे महाराष्ट्रतील एकमेव वस्तीस्थान असलेल्या कोल्हार भगवतीपूर येथे| श्री भगवती माता यात्रा नियोजन बैठक भक्तीमय वातावरणात संपन्न

कोल्हार भगवतीपूर येथील तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता, कोल्हार भगवतीपूरची भगवती माता आणि वणीची सप्तशृंगी माता अशा साडेतीन शक्तिपीठांचे एकत्रित आणि दिव्य वास्तव्य लाभलेल्या पवित्र भूमीत ग्रामदैवत श्री भगवती मातेच्या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटी आणि कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या वतीने भगवती देवी मंदिरात यात्रा नियोजन व आढावा बैठक अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाच्या वातावरणात पार पडली. आगामी पोष पौर्णिमा दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या श्री भगवती माता यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सर्वप्रथम मागील वर्षाच्या यात्रा उत्सवाचा जमा–खर्चाचा सविस्तर आणि पारदर्शक आढावा सर्व ग्रामस्थांसमोर मांडण्यात आला. त्यानंतर यावर्षी यात्रेमध्ये होणाऱ्या विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांची सविस्तर रूपरेषा उपस्थितांना सांगण्यात आली. यावेळी माहिती देताना सांगण्यात आले की यंदाच्या श्री भगवती माता यात्रेमध्ये यात्रेतील दुकाने तब्बल अकरा दिवस चालणार असून भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात्रा उत्सवात आई श्री भगवती मातेची सवाद्य पालखी मिरवणूक ही २ जानेवारी रोजी सायंकाळी मंदिरापासून अत्यंत भक्तीभावाच्या आणि आनंदी वातावरणात काढण्यात येणार आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी ३ जानेवारी रोजी सकाळी लोककलावंतांच्या हजेऱ्या, दुपारी न्यू इंग्लिश स्कूल, कोल्हार बुद्रुक येथे कुस्ती हगामा, तर ४ जानेवारी रोजी दुपारी कोल्हार येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय यात्रेमध्ये करमणुकीचा भाग म्हणून लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम, मोठे पाळणे तसेच विविध करमणुकीचे उपक्रम भाविकांसाठी ठेवण्यात आले आहेत. यावेळी बोलताना अ‍ॅडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे यांनी सर्व ग्रामस्थांना आवाहन केले की सर्वांनी स्वतःहून यात्रेमध्ये सहभाग घ्यावा आणि एकत्र येऊन आई भगवती मातेच्या यात्रेची शोभा वाढवावी. तसेच ही यात्रा राजकारणविरहित, शांततेत आणि भक्तीभावात पार पाडण्याचा निर्धार सर्व ग्रामस्थांनी करावा असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारच्या विघ्नसंतोषी किंवा खोडसाळ प्रवृत्तींना थारा दिला जाणार नसून आई भगवती मातेच्या यात्रेचे पवित्र नाव खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोल्हारचे ग्रामस्थ योग्य तो धडा शिकवतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. एकूणच भक्तीमय, आनंदी, शांततेच्या आणि एकोप्याच्या वातावरणात श्री भगवती माता यात्रा नियोजन व आढावा बैठक यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीस कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजीराव रघुनाथ खर्डे, उपाध्यक्ष साहेबराव दळे, अ‍ॅडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे, सरचिटणीस संपतराव कापसे, विश्वस्त विजय निबे, संभाजी देवकर, वसंतराव खर्डे, सुजित राऊत, पंढरीनाथ खर्डे, सरपंच प्रकाश खर्डे, रावसाहेब कमळाजी खर्डे, ऋषिकेश खांदे, गोरख खर्डे, अशोक खर्डे, बाबासाहेब दळे, भाऊसाहेब जाधव, बाळासाहेब खर्डे, दिलीप बोरुडे, नानासाहेब कडसकर, श्याम लोखंडे, शरद खर्डे, राजेंद्र राऊत, अक्षय मोरे, केतन लोळगे, वसंतराव मोरे, तबाजी लोखंडे, गणेश गागरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें