प्रवरा नगरी वार्ता कोल्हार भगवतीपुर
ग्राहकांची मोठी गर्दी; इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, फटाके आणि फराळाच्या खरेदीला उधाण
कोल्हार भगवतीपूर – गेल्या काही दिवसांपासून शांत असलेली कोल्हार-भगवतीपूर बाजारपेठ दिवाळीच्या स्वागतासाठी सजली असून खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली आहे. बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू झाली असून सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात उभारली गेली आहेत.सजावटीचे आकाशदिवे लक्ष्मीपूजनाची साहित्ये, झाडू, रांगोळी, पणत्या, शृंगार साहित्य, बच्चेकंपनीसाठी फटाके, महिलांसाठी साड्या-ड्रेस मटेरियल, पुरूषांसाठी कपडे तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकांनाही मोठी मागणी वाढली आहे. किराणा, दिवाळी फराळाचे साहित्य आणि गोड पदार्थ विकणाऱ्या दुकानांत ग्राहकांची रांग लागली आहे.
भगवती मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या भव्य फटाक्यांच्या स्टॉलमुळे तर बाजारपेठेत वेगळाच आकर्षण निर्माण झाला आहे. त्याचबरोबर कपडे, मोबाईल, घरगुती उपकरणे, एलईडी दिवे आणि सजावटीच्या वस्तूंवर आकर्षक सवलत योजना जाहीर केल्याने ग्राहकांचा प्रतिसाद आणखी वाढताना दिसत आहे.
अलीकडील पावसामुळे शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली होती. तरीही दिवाळी हा आनंदाचा सण असल्याने शेतकरी वर्गही खरेदीत सहभागी होताना दिसत आहे. आजूबाजूच्या गावांतील महिला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात कोल्हार भगवतीपूर बाजारपेठेत दाखल होत आहेत.
‘प्रवरा नगरी वार्ता’ प्रतिनिधीने बाजारपेठेला भेट दिली असता, व्यापाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आशादायी असल्याचे दिसून आले. “या वर्षी दिवाळीचा बाजार अपेक्षेपेक्षा चांगला सुरू असून ग्राहकांचा मोठा प्रतिसाद आहे,” अशी माहिती स्थानिक व्यापाऱ्यांनी दिली.
एकूणच दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हार-भगवतीपूर बाजारपेठेत उत्साह आणि चैतन्य ओसंडून वाहतानादिसत आहे.

आमच्या शोरूमला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवरील विशेष सवलतीमुळे ग्राहकांचा उत्साह वाढला असून महिलावर्ग मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत आहे.”
“दीपावली निमित्त सुरू केलेल्या विशेष ऑफरचा लाभ घेण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधील ग्राहक मोठ्या प्रमाणात आमच्या शोरूमला भेट देक्षत आहेत. आधुनिक डिझाईन्स, कमी मजुरी आणि विश्वासाची परंपरा यामुळे ग्राहकवर्ग समाधानी आहे.” – रोहित देडगावकर देडगावकर ज्वेलर्स कोल्हार बु

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या नवीन व्हर्जनमुळे तसेच नवीन मोबाईल मॉडेल्सच्या उपलब्धतेमुळे ग्राहकांची खरेदी वाढली आहे. आमच्या सवलत योजनांमुळे दिवाळी खरेदीसाठी ग्राहक मोठ्या संख्येने येत आहेत.”
आप्पासाहेब राजभोज, हरी बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, कोल्हार बु
“अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच शेतमालाला कमी भाव, मजूर टंचाईमुळे पीक काढणीला होणारा उशीर या कारणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याचा परिणाम यावर्षीच्या दिवाळी उत्सवावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. बाजारपेठेत अपेक्षित उलाढाल अद्याप झालेली नाही.”
अशोक शेठ असावा-कल्याणी साडी सेंटर & कलेक्शन कोल्हार बु
.
“दिवाळी निमित्त बाजारपेठेत ग्राहकांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहेत. मात्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना बसलेल्या आर्थिक फटक्याचा थोडासा परिणाम या वर्षीच्या दिवाळी खरेदीवर जाणवत आहे.”— दिपक साबळे ,स्वामी समर्थ फर्निचर, कोल्हार बुद्रुक
“यावर्षी बाहेरगावचा व्यवसाय कोल्हारमध्ये टिकू शकला नाही. अहमदनगर–मनमाड रस्त्याची दयनीय अवस्था असल्याने बाहेरील ग्राहक कोल्हारमध्ये येण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यातच पावसाचा व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. मात्र धनत्रयोदशीपासून बाजारपेठेत खऱ्या अर्थाने दिवाळीचा माहोल निर्माण झाला असून खरेदीला सुरुवात झाली आहे. आता शेवटच्या टप्प्यात बाजारपेठ फुलताना दिसत आहे.” – भगवान खाटेकर-ओम साई डिपार्टमेंट, कोल्हार बु
पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्यामुळे बाजारपेठेत मंदी जाणवत होती. तसेच रस्त्याच्या खराब स्थितीमुळे बाहेरील ग्राहक कोल्हारमध्ये येण्यास टाळाटाळ करत होते. मात्र बऱ्याच दिवसानंतर वसुबारसपासून बाजारात दिवाळीच्या वातावरणाची सुरुवात झाली असून ग्राहकांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली आहे,” असे जया भाटिया यांनी सांगितले.— जयराम शेठ भाटिया, सिद्धेश्वर सुपर शॉपी

दिवाळी-पाडव्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी नवीन विक्रीवाढ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना ३,००० रुपये खरेदीवर लाखो रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी दिली गेली आहे. या योजनेला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.”
राहुल भावसार -भावसार क्लॉथ कोल्हार बुद्रुक— भावसार क्लॉथ, कोल्हार
