प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलासाठी झरेकाठी येथे आमरण उपोषण – तिसरा दिवस; ग्रामपंचायतीच्या धोरणाविरोधात रोष

प्रवरा नगरी वार्ता 

झरेकाठी वार्ताहर – केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (ग्रामीण) मंजूर झालेल्या घरकुलासाठी मिळणारी परवानगी ग्रामपंचायत देत नसल्याच्या निषेधार्थ झरेकाठी येथील अनिल दत्तात्रय आहेर यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. या उपोषणामुळे गावातील वातावरण चांगलेच चिघळले असून ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अनिल आहेर आणि त्यांची आई श्रीमती लिलाबाई दत्तात्रय आहेर यांच्या नावावर आर्थिक वर्ष २०२४-२०२५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना मधील घरकुल मंजूर झाले असूनही, ग्रामपंचायत कार्यालयाच्या आडमुठ्या आणि पक्षपाती धोरणांमुळे घरकुल बांधकामासाठी आवश्यक परवानगी आजपर्यंत मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे

या अन्यायाविरोधात अनिल आहेर यांनी झरेकाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज तिसरा दिवस असून उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत चालली असतानाही संबंधित प्रशासनाने समाधानकारक तोडगा काढलेला नाही.

आज उपोषण स्थळी आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सोनवणे, तसेच ए.एस.आय. श्री. गोपाळे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या भेटीवेळी गावचे कामगार पोलीस पाटील सुदाम वाणी उपस्थित होते. गावकऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवून आहेर यांना न्याय मिळावा अशी मागणी केली.

यासंदर्भात ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंचांशी विचारणा करण्यात आली असता त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की –

“घरकुलासाठी जागा फक्त भूमिहीन लाभार्थ्यांनाच दिली जाते. ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे, अशा लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीमार्फत जागा उपलब्ध करून देण्यात येत नाही.”

मात्र लाभार्थी अनिल आहेर यांचे म्हणणे असे आहे की –

 “घरकुल मंजूर असताना परवानगी नाकारणे हा शासनाच्या योजनेचा अवमान व घरकुल मिळण्याच्या मूलभूत अधिकाराचा भंग आहे. आम्ही पात्र लाभार्थी असूनही परवानगी रोखली जात आहे.”

या प्रकरणात गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून पक्षपात, राजकीय द्वेष आणि ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार या कारणांमुळे हे अन्यायकारक निर्णय होत असल्याचा आरोप जनतेतून व्यक्त केला जात आहे. उपोषणकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की परवानगीच्या मागणीवर तोडगा निघेपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही.

या प्रकरणाचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment