कोल्हारमध्ये धनगर समाजाचा संताप – अनिकेत वडितके आत्महत्येप्रकरणी रास्ता रोको!

कोल्हार, ता. राहाता – वार्ताहर

१७ वर्षीय अनिकेत सोमनाथ वडितके या निष्पाप युवकाच्या आत्महत्येमुळे संपूर्ण धनगर समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी कोल्हार भगवतीपूर येथील नगर–मनमाड महामार्गावर सकल धनगर समाजाच्या वतीने अर्ध्या तासासाठी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या दरम्यान महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

गळनिंब येथील टेम्पोचालक अनिकेत वडितके याला कथित गोरक्षकांनी कत्तलखान्यात जनावर नेत असल्याच्या संशयावरून बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला, ज्यामुळे झालेल्या सार्वजनिक अपमानामुळे अनिकेतने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी लोणी पोलीस स्टेशनमध्ये चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

शुक्रवारी सकाळी ११ वा. कोल्हार–मनमाड महामार्गावर आंदोलकांनी “अनिकेतला न्याय मिळालाच पाहिजे! दोषींना फाशी द्या!” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलकांनी डीवायएसपी अमोल भारती व तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहून त्यांना त्वरित न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली.

या आंदोलनात धनगर समाजाचे संघर्षयोद्धा दीपक बोऱ्हाडे, यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख विजय तमनर, रासपचे सरचिटणीस डॉ. सुनील चिंधे, सरपंच शिवाजी चिंधे, उपसरपंच दत्तात्रय माळी, तसेच पंचक्रोशीतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिर्डी डी.वाय.एस पी अमोल भारती यांना निवेदन देण्यात आले
निवेदन स्वीकृत झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणात राज्य सरकार व पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण धनगर समाजाचे लक्ष लागले आहे.

प्रवरा नगरी वार्ता / विशेष प्रतिनिधी

Leave a Comment