प्रवरा नगरी वार्ता (अहिल्यानगर)
संभाजीनगर – नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी महाराष्ट्र (NLU) येथील पदवीदान समारंभात कुमारी अनुष्का बाबासाहेब शेलार हिला कायद्यातील सर्वोच्च पदवी LL.M. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल गौरविण्यात आले. कायद्याच्या क्षेत्रातील उल्लेखनीय यश संपादन करताना अनुष्काने उत्तुंग शैक्षणिक कामगिरी साध्य केली आहे.
LL.B. पदवी प्राप्त केल्यानंतर अनुष्काने अलीकडेच LL.M. ही पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत पूर्ण केली. त्यानिमित्त आयोजित पदवीदान समारंभात भारताच्या न्यायव्यवस्थेतील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते तिला पदवी प्रदान करण्यात आली.
या समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा. श्री. विक्रमनाथ, सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश मा. प्रसन्न वराळे आणि मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मा. चंद्रशेखर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी महाराष्ट्रचे चान्सलर व मुंबई हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश डॉ. ओक, तसेच व्हाइस-चान्सलर बिंदू रोनाल्ड यांसह न्यायालयीन व कायदा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कायद्याच्या अभ्यासाबरोबर अनुष्काने व्यावहारिक अनुभव मिळवण्यासाठी कर्नाटक हायकोर्ट, बेंगळुरू येथे इंटर्नशिप पूर्ण केली आहे. तिच्या या शैक्षणिक प्रगती व कर्तृत्वाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
अनुष्का शेलार या सामाजिक, शैक्षणिक व वाचन चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते, महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त प्रा. बाबासाहेब शेलार यांच्या कन्या असून त्यांच्या कुटुंबात शैक्षणिक परंपरा व ज्ञानसंवर्धनाची परंपरा जोपासली जाते.
अनुष्काच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील काळात न्यायव्यवस्थेत कार्यरत राहून समाजाभिमुख कायदेसेवा करण्याची तिची इच्छा आहे.

