लोणी व कोल्हार परिसरातील विविध विकासकामांचा घेतला आढावा; नागरिकांच्या समस्या ऐकून अधिकाऱ्यांना दिले तातडीचे निर्देश
लोणी/कोल्हार | प्रतिनिधी
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी मुसळधार पावसाची पर्वा न करता लोणी खुर्द, लोणी आणि कोल्हार परिसरातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला. सुरू असलेल्या कामांचा दर्जा, प्रगती आणि पावसाळ्यात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी कोल्हार–नांदूर शिंगोटे महामार्गाच्या कामाची ग्रामस्थांसमवेत पाहणी करण्यात आली. वाहतुकीची सुरक्षितता, रस्त्याच्या गुणवत्तेसह पावसामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींची माहिती घेत कामात कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
त्यानंतर लोणी खुर्द येथे सुरू असलेल्या महामार्ग व गटर बांधकामाची पाहणी करून ग्रामस्थांनी मांडलेल्या विविध समस्या व सूचनांची दखल घेत संबंधित यंत्रणेला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, भर पावसातही डॉ. विखे पाटील यांनी लोणी येथील एका पंक्चर दुकानातच जनता दरबार भरविला. मतदारसंघासह जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी निवेदनांच्या माध्यमातून आपापल्या समस्या मांडल्या. प्रत्येक नागरिकाचे म्हणणे शांतपणे ऐकून संबंधित विभागांशी संपर्क साधत प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीच्या सूचना त्यांनी दिल्या.
यानंतर कोल्हार येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचीही ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. कामातील त्रुटी निदर्शनास आणून देत संबंधित अधिकारी व ठेकेदारांना गुणवत्तापूर्ण, सुरक्षित आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश डॉ. विखे पाटील यांनी दिले.
भर पावसातही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन विकासकामांची पाहणी करणे, नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन तातडीने कार्यवाहीचे आदेश देणे आणि विकासकामांच्या गुणवत्तेबाबत ठाम भूमिका घेणे, या कार्यशैलीचे उपस्थित ग्रामस्थांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले.










