दुबैय्या हत्या प्रकरणाचा तपास मुळापर्यंत नेण्याच्या सूचना; ना. राधाकृष्ण विखे पाटील

श्रीरामपूर, दि. १६, प्रतिनिधी : शहरातील युवा उद्योजक आकाश दुबैय्या यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणाचा तपास गोपनीयता राखून सुरू आहे. घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून, तपासाला आवश्यक ती गती देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

दुबैय्या यांच्या हत्येला एक महिना उलटूनही मुख्य आरोपीचा शोध लागलेला नसल्याच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीयांनी दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर ना. विखे पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांच्या भावना समजून घेत तपासाबाबतची माहिती घेण्यात आली.

आजपर्यंत झालेल्या तपासाची माहिती माध्यमांसमोर देण्याच्या सूचना अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तपास प्रक्रियेबाबतचे गैरसमज दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास ना. विखे पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून, जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अमली पदार्थांची तस्करी हा जिल्ह्यासमोरील गंभीर प्रश्न असून, त्यावर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. श्रीरामपूर शहरातील महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट उघडकीस आल्याची बाब गंभीर असून, या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालू नये आणि दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें